
अमरावती: बीटी कपाशीच्या एका विशिष्ठ वाणाच्या बियाण्यांची मागणी अकोला व अमरावती जिल्ह्यात वाढली आहे. मात्र, कृषी केंद्रांमधील स्टॉक संपला आहे. राज्यात अन्यत्र या वाणाला मागणी नसल्याने त्या जिल्ह्यातील शिल्लक बियाणे अमरावती जिल्ह्यात येत आहे व खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये ८६४ रुपयांची बॅग काळ्याबाजारात १५०० रुपयांना विकल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
दोन वर्षांपासून बीटी कपाशीच्या एका विशिष्ट वाणाची मागणी अमरावती, अकोला जिल्ह्याच्या प्रामुख्याने खारपाणपट्टयात वाढली आहे.मागणीच्या तुलनेत १० टक्केही बियाणे पाकिटांचा पुरवठा त्या कंपनीद्वारा झाला नाही. त्यामुळे कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा व त्यातून वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. यावर कृषी विभागाने कृषी केंद्रांमध्ये कृषी सहायकाची नियुक्ती केली व त्याच्या उपस्थितीत एका शेतकऱ्याला दोन पाकिटे देण्यात आली. त्यामुळे हंगामपूर्वीच जिल्ह्यातील बियाण्यांचा स्टॉक संपला व तसे कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनेद्वारा कृषी विभागाला लेखी देण्यात आलेले आहे.
आडमार्गाने आवक, निकटस्तांना विक्री अन्य जिल्ह्यातील कृषी केंद्रात शिल्लक बीटीच्या त्या वाणाचे बियाणे आडमागनि जिल्ह्यात आणल्या जात आहे. अकोला जिल्हा सीमेलगत खारपाणपट्टा असलेल्या भागात काही विक्रेत्यांद्वारा तो गोरखधंदा सुरू झाला आहे. या बियाण्यांची साठवणूक अन्य ठिकाणी करण्यात येते व निकटस्त शेतकऱ्यांना दामदुप्पट दराने विक्री केली जाते.
शेतकरी तक्रार करणार केव्हा?विक्रेत्यांद्वारा बीटी कपाशीचे विशिष्ट वाण केवळ परिचयातील शेतकऱ्यांना विकल्या जात आहे. यात तक्रार दाखल होण्याची शक्यता कमी असल्याने बियाण्यांच्या दुप्पट भावाने शेतकऱ्याची लूट होत आहे. भातकुली व दर्यापूर तालुक्यात असा प्रकार होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
अनधिकृत व्यक्तीकडून शेतकऱ्याने बियाणे खरेदी करू नये. यामध्ये फसवणूक होण्याचा धोका आहे. सर्व बीटी बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. बियाण्यांचा काळाबाजार होत असल्यास कृषीकडे तक्रार करावी.
– राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







