एक्झिट पोल आले; कोण जिंकणार? आता उमेदवारांची धाकधूक वाढली!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी सायंकाळी एक्झिट पोल आलेत. हे पोल किती खरे, किती खोटे हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयाबद्दल आश्वस्त असून, एक्झिट पोलनुसारच निकाल लागेल, असा विश्वास त्यांना आहे. तर अमरावती लोकसभेत नक्कीच परिवर्तन होईल, अशी खात्री महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे, प्रहारचे दिनेश बूब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना आहे.

२६ एप्रिल रोजी अमरावती लोकसभेची निवडणूक आटोपली. तब्बल ३८ दिवसांनंतर मतमोजणी होणार आहे. अमरावती लोकसभेची निवडणूक नवनीत राणा यांच्या उमेदवारीने ‘हाय होल्टेज’ ठरली.

भाजपकडून पहिल्यांदाच अमरावती लोकसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर राणांच्या रूपाने उमेदवारी देण्यात आली आहे. तर २८ वर्षांनंतर काँग्रेसने महाविकास आघाडीतून पंजावर आमदार बळवंत वानखडे यांच्या रूपाने उमेदवार रिंगणात उतरविला आहे. ही निवडणूक भाजप अथवा काँग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरणारी आहे. माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी प्रहारकडून दिनेश बूब यांना उमेदवारी देत महायुतीसोबत पंगा घेतला आहे. तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे आंबेडकरी विचारांची किती मते घेतात? यावरही बरेच काही राजकीय गणित अवंलबून आहे. अमरावती लोकसभेची निवडणूक ही विकासावर गाजलीच नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, जुने उट्टे काढण्यातच रंगली. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा, बैठका झाल्यात. मात्र, आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू यांच्यातील कलगीतुरा सर्वाधिक चर्चिला गेला. तर नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये काही दिवस खदखद होती. परंतु नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्याने रुसवे फुगवे बाजूला सारत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटल्याचे दिसून आले. परिणामी शनिवारच्या एक्झिट पोलमध्ये अमरावतीत नवनीत राणा या निवडून येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. नव्या-जुन्या काँग्रेस नेत्यांना एकत्र केले. म्हणून अमरावतीतून काँग्रेसच विजयी होणार, असा दावा आ. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. एकंदरीत दावे- प्रतिदावे होत असले तरी ४ जून रोजी कोण जिंकणार? हे स्पष्ट होणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!