
परतवाडा : सदर बाजारातील प्रतिष्ठानाला लागलेल्या आगीचे कारण शॉर्टसर्किट असले तरी शहरातील सर्व प्रतिष्ठानांचे फायर ऑडिट व इतर उपाययोजना करण्याच्या सूचना नगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जाणार आहेत.
अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. सर्व प्रतिष्ठानांसह संबंधित विभागांना पत्र पाठवून कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनीसुद्धा योग्य ते निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. ‘z24news.dreamhosters.com’ने या सर्व बाबींचा पाठपुरावा केला होता, हे विशेष.
परतवाडा शहरातील कुठल्याच दुकानामध्ये आग नियंत्रण व्यवस्था नाही. अचलपूर नगरपालिकेने यापूर्वी दोनवेळा संबंधितांना नोटीस बजावल्या. मात्र, योग्य तो प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दिला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने गजबजलेल्या शहरातील सदर बाजार गुजरी बाजार व इतरही ठिकाणी नियमाने आवश्यक त्या उपाययोजना सक्तीने केल्या जाणार आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने येणारे अडथळे दूर केले जाणार आहेत. परतवाडा शहरात नजीकच्या चिखलदरा, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, बैतूल, भैसदेही तालुक्यांतून दररोज हजारो नागरिक मुख्य बाजारपेठ म्हणून खरेदीसाठी येतात. वाहतुकीची कोंडी, अरुंद रस्ते, अडथळा करणारे अतिक्रमण, विद्युत आणि टेलिफोन खांब, रस्त्यावर उभ्या असणाऱ्या चारचाकी-दुचाकी व इतरही अडचणींवर मात करणे गरजेचे असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.
या सर्व बाबींची आता आ. बच्चू कडू व मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी दखल घेतली आहे. परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी आग नियंत्रणात येण्यासाठी केलेले कार्य तसेच परिसरातील युवकांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले, तर अग्निशमन दलाचे संदेश जोगदंड व कर्मचारी यांनी अनेक अडचणींवर मात करत अग्निशमन वाहनाच्या तब्बल १७ फेऱ्या केल्या. अन्यथा अग्नितांडव परिसरातील अनेक प्रतिष्ठानांची राखरांगोळी करणारे ठरले असते, हे नक्की.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






