
अचलपूर : स्थानिक नगर परिषदेतर्फे अचलपूर शहराला पाइप लाइनद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात अत्यंत कमी प्रमाणात व कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पारा ४४ अंशाच्या वर जात असताना प्रचंड उष्म्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अचलपूर शहरातील देवडी, बिलनपुरा, माळवेशपुरा, बुंदेलपुरा, दिलदारपुरा, अन्वरपुरा, हिरापुरा, ठिकरीपुरा, गुणवंतनगर, महाल, मुकेरीपुरा, भोईपुरा भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणी जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
अचलपूर शहराला चंद्रभागा धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. या धरणावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पुढील चार-पाच दिवस असाच कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे. यादरम्यान नागरिकांकडे पर्यायी साधने उपलब्ध नसल्याने उन्हाने जिवाची लाहीलाही होत असताना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकात प्रचंड रोष आहे.
चंद्रभागा धरणावर तांत्रिक बिघाड झाला आहे. जलसंपदा विभागातर्फे धरणाच्या गेटचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यापेक्षा ३० टक्के कमी पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे अचलपूर शहरात कमी प्रमाणात व कमी दाबाचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हीच परिस्थिती चार-पाच दिवस राहणार आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे. अपव्यय टाळावा, पाच-सहा दिवसानंतर स्थिती सामान्य होईल.
धीरजकुमार गोहाड, मुख्याधिकारी, अचलपूर नगरपालिका
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






