
अमरावती : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विजयासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. म्हणूनच पाच लाखांच्यावर मते मिळाली. ही मते कोणी दिलीत. ती काही अस्मानातून पडली नाहीत. परंतु याचा विचार न करता पराभव झाल्यानंतर विनाकारण टीका व पराभवाबद्दल जाब विचारत असाल तर खबरदार आपण सहन करणार नाही, असा थेट इशारा आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी गुरूवारी येथे दिला.
महायुतीच्या उमेदवार नवनीत रवी राणा या पराभूत झाल्यानंतर भाजप व राजकीय गोटात निराशा निर्माण झाली आहे. अशातच बुधवारी शहराध्यक्ष आ. प्रवीण पोटे पाटील यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र गुरुवारी त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक बोलाविली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार पोटे यांनी राजीनामा परत घ्यावा, अशी गळ घातली. यावेळी बोलताना आ. प्रवीण पोटे पाटील म्हणाले की, आपण राजीनामा दिला असून तुम्ही मागे घेण्याची विनंती करत आहात. त्यामुळे तुमच्या भावनांचा सन्मान आहे. परंतु आपण सर्वजण भाजप उमेदवारासाठी झटलो आहोत. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली. राणांनी ५ लाखांहून अधिक मिळालेली मते ही भाजपचीच, दुसऱ्याची नव्हे असे ते म्हणाले. त्यांच्या पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांना जाब विचारला जात आहे.
कार्यकर्त्यांना डिवचणे सुरू आहे. अप्रत्यक्षरित्या टीका करून पक्षातील निष्ठावंतांना संशयाच्या दृष्टीने बघणे योग्य नाही. आपण ही बाब कदापि सहन करणार नाही, असेही प्रवीण पोटे म्हणाले. मी राजीनामा परत घेऊ शकत नाही. प्रदेशाध्यक्षकडे तो सोपविला आहे. त्यांचा निर्णय सर्वातोपरी राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, डॉ. नितीन धांडे, जयंत डेहनकर, किरण महल्ले, अॅड. प्रशांत देशपांडे, सिद्धार्थ वानखडे, प्रशांत शेगोकार, सुनील काळे, लता देशमुख, गंगा खारकर व माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

विकास सांगितलाच नाही लोकसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत भाजपने केलेला विकास आम्ही सांगण्यात अपयशी ठरलो असे आ. प्रवीण पोटे म्हणाले. आम्ही केवळ उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली. परंतु विकास सांगितला असता तर जनतेने आम्हाला मतदान केले असते. परंतु तसे घडले नाही.
सर्वत्र हीच अवस्था अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रात भाजपला यश मिळालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले. आमदार प्रवीण पोटे पाटील पक्षाचे आधारस्तंभ असल्याची भावना व्यक्त केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






