वरूड : पुण्याच्या पोर्शे कारमुळे पुन्हा हिट अँड रन प्रकरणाची चर्चा होऊ लागली. परंतु, ग्रामीण भागातील युवक बेदरकारपणे दुचाकी चालवून स्वतः दुसऱ्याच्या मृत्यूचे कारण बनत आहेत. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. यावर अंकुश आहे तरी कुणाचा, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५६ हा वरूड ते मध्य प्रदेश बॉर्डर पुसला गावावरून जातो. वनविभागाच्या काष्ठ आगारालगतचा एकेरी वळण रस्ता आणखी किती बळी घेणार, हे अधिकारी बघणार की तातडीने पडलेले खड्डे आणि कडा बुजविणार, हा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर आंदोलनाचा पवित्र्यात असून स्वखर्चातून रस्त्याचे काम करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय श्रीराव यांनी दिला आहे. परिवहन विभाग लाइफटाइम रोड टॅक्स घेतात तरी रस्त्याच्या दुर्दशा कायम आहे. टोल टॅक्स देऊनही रस्त्यावर भेगा आणि खड्डे कायम आहेत. निकृष्ट कामाचे उत्कृष्ट नमुन्याचे रस्ते वाहनचालकांसह नागरिकांच्या जिवावर उठल्याने दिवसागणिक अपघाताची श्रृंखला सुरूच आहे. यातच
बेदरकार दुचाकी, चारचाकी रस्त्याने अक्षरशः उडवल्या जातात. यात निष्पाप बळी जात असल्याने याला आळा घालणे गरजेचे आहे. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक, प्रवासी वाहतूक आणि अनफिट वाहने सुसाट धावताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे अधिकारी करतात तरी काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुण्याच्या पोर्शे कार प्रकरणापासून चर्चेचा विषय झाल्याने परिवहन विभागाने रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची तपासणी करून योग्यता असल्याचे वाहन रस्त्यावर चालविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






