
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘स्पॉट’ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्यनिर्वाह निधीची (ईपीएफ) रक्कम गत २९ वर्षांपासून त्यांच्या खात्यात भरण्यात आलीच नाही. या प्रकरणी गत १५ दिवसांपूर्वी ईपीएफच्या चमूने विद्यापीठात भेट देत वास्तव जाणून घेतले आहे. तब्बल १० कोटींच्या वर कर्मचाऱ्यांचा ईपीएफ रकमेचा भरणा केला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने अमरावती विद्यापीठात ‘स्पॉट’ कर्मचारी कार्यरत आहेत; तर या कर्मचाऱ्यांचे १९९५ पासून, तर २०२४ या वर्षापर्यंत ईपीएफचा छदामही भरला नाही, अशी कर्मचाऱ्यांची ओरड आहे. प्रशासनाकडून १०८ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईपीएफची रक्कम कपात होत असताना ही रक्कम प्रशासनाने ईपीएफकडे वळती केली नाही, हा लढा कर्मचारी २०१६ पासून देत आहेत. यांतील काही कर्मचाऱ्यांचे निधनही झाले आहे. असे असताना विद्यापीठ प्रशासन केवळ वेळकाढू भूमिका घेत असल्याचा ठपका कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे.
या अन्यायाविरोधात ‘स्पॉट’ कर्मचाऱ्यांनी दिल्ली येथील ‘ईपीएफ’ कार्यालयात तक्रार दिल्यानंतर आता या प्रकरणाची फाइल ओपन झाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना आताही ‘तारीख पे तारीख’ असाच अनुभव येत आहे. त्यामुळे आमच्या हक्काची ‘ईपीएफ’ची रक्कम खात्यात जमा करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून जोर धरू लागली आहे.
व्यवस्थापन परिषदेतही गाजले ‘ईपीएफ’स्पॉट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ थकीत रकमेचा विषय यापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही गाजला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या हक्काची रक्कम त्यांच्या ईपीएफ खात्यात का, कोणी भरणा केला नाही? प्रशासनाकडून नेहमीच वेळकाढू भूमिका वठविली जाते. त्यामुळे विद्यापीठात कर्मचारी ‘ईपीएफ’चा १० कोटींचा गुंता सुटत नसल्याचे चित्र आहे. दीड वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांनी संपदेखील केला होता.
कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ रकमेसंदर्भात नोटीस आली आहे. याविषयी कायदेशीर उत्तर दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे कोणत्याची प्रकारे नुकसान होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या निदर्शनास आणून दिला आहे.
– मंगेश वरखडे, प्रभारी कुलसचिव, विद्यापीठ.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






