
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी अन् मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी पाचच्या सुमारास मृगधारा कोसळल्या. यामुळे उकाडा कमी झाला असला तरी शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मृगाच्या सरी सोमवारपाठोपाठ मंगळवारीही परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात बरसल्या. चांदूर बाजार तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ब्राह्मणवाडा थडी येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे येथेही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. येवदा परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन लोकांना दिलासा मिळाला. मांजरखेड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. दुपारी ३ च्या सुमारास चिरोडी, गौरखेडा, तरोडा, बासलापूर, मांजरखेड कसबा आदी गावांतही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वरूड तालुक्यात राजुरा बाजारसह वडाळा, चिंचरगव्हाण, वाडेगाव, हातुर्णा, गाडेगाव येथेही विजांचा कडकडाट होता. अंजनगावसुर्जीत वारे, विजांचा कडकडाट होता, तर वनोजा बाग, चिंचोली बुद्रुक, रहिमापूर, कुंभारगाव, निंबारी, गावंडगाव परिसरात तासभर पाऊस कोसळला. मंगरूळ दस्तगीर येथेही पाऊन कोसळला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






