धामणगाव रेल्वे : पिकअप वाहन टैंकरला मागून भिडल्याने अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हायवेवर तळेगाव दशासर गावाजवळ मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास झाला. पोलिस सूत्रांनुसार, पिकअप वाहन (एम.एच. ३२ ए.जे. ३४७८) हे तळेगाव दशासरकडून देवगावकडे येत होते. यात चालकासह चारजण होते. यादरम्यान समोर चालत असलेल्या टैंकर (एम.एच. ३८ डी ९७८६) ला पिकअप वाहन भिडले. यात पिकअप वाहनातील राहुल रामदास मांढरे (२६), विजय विठ्ठल मांढरे (३२, रा. भोपापूर वाणी, ता. देवळी, जि. वर्धा) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दिलीप सोनबाजी न्हाने (३७, रा. भोपापूर वाणी) व चालक किशोर रामचंद्र नेहारे(३३, रा. लोणी ता. देवळी जि. वर्धा) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना महामार्ग पोलिस पथकाचे सदानंद देशभ्रतार, कुंदन राठोड, तातेड, तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील रमेश दाते, विनोद राठोड, संजय राऊत यांनी स्थानिकांच्या मदतीने धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास ठाणेदार रामेश्वर घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






