
अमरावती : पावसाच्या सरीचा आनंद घेत असतानाच विजेचा स्पर्श झाल्याने सहा वर्षीय बालिकेचा करून अंत झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील संजय गांधी नगर क्रमांक २ येथे घडलेल्या या घटनेत एका बालिकेच्या मृत्यूसह दुसरी बालिका गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निवी नीलेश दंदे असे विजेचा स्पर्श झाल्याने दगावलेल्या सहा वर्षीय बालिकेचे नाव आहे. तर याच घटनेत वंशिका मोहन लोणकर ही आठ वर्षे बालिका गंभीररीत्या जखमी झाली आहे. शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच संजय गांधी नगर क्रमांक २ येथील पाच ते सहा मुली या परिसरातील दिलीप लांजेवार यांच्या घराच्या छतावर गेल्या. याठिकाणी पावसाच्या सरीचा सर्व बालिका आनंद घेत होत्या. पावसाच्या सरीचा आनंद घेत असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला, यावेळी विजेचा स्पर्श या छताला झाला. यात निवी दंदे व वंशिका लोणकर या दोन बालिका गंभीररीत्या जखमी झाल्या. छतावर खेळत असलेल्या अन्य मुलींना ही बाब लक्षात येतात त्यांनी तत्काळ घरच्या मंडळींना याबाबत माहिती दिली. जखमी झालेल्या दोन्ही मुलींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान निवी नीलेश दंदे हिचा मृत्यू झाला. तर वंशिका लोणकर हिच्यावर रुग्णालयात उपचारानंतर सुखरूप असल्यामुळे सुटी देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच निवी हिचे नातेवाईक व जखमी झालेल्या वंशिकाचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. निवीचा मृत्यू झाल्याचे समजतात तिच्या नातेवाईकांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णालय परिसरातील वातावरण धीर गंभीर झाले होते. या घटनेमुळे शहरातील संजय गांधी नगर येथे शोककळा पसरली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






