
अमरावती : एका विशिष्ट कापूस वाणाची (बियाणाची) ज्यादा दराने व छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालकाला कृषी विभागाने ट्रॅप केले. १२ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास जुना कॉटन मार्केटस्थित नितीन कृषी केंद्रात ही कारवाई करण्यात आली.
तेथून विशिष्ट कापूस वाणाचे दहा पॅकेट जप्त करण्यात आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी १२ जून रोजी रात्री नीलेश राजकुमार अग्रवाल (४८, रा. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन कृषी केंद्राचा संचालक नीलेश अग्रवाल याला ८६४ रुपये एमआरपी असलेले कापूस वाणाचे ४७५ ग्रॅमचे पॅकेट थेट १८०० रुपयांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले.
विशेष म्हणजे कृषी विभागाने ही कारवाई डमी ग्राहक पाठवून यशस्वी केली. तपासणीत १० पॅकेट जप्त केले. कृषी उपसंचालक उज्वल आगरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली.
डमी ग्राहकांनी दिले नऊ हजार रुपये पथकाने डमी ग्राहकाला नितीन कृषी केंद्रात ९ हजार रुपये घेऊन पाठविले. नीलेश अग्रवाल याने एका विशिष्ट कापूस बियाणाची प्रति पॅकेट किंमत ८६४ रुपये असताना १८०० रुपये अशा दामदुप्पट दराने नऊ हजार रुपये घेऊन पाच पॅकेट दिले. त्याचे बिल दिले नाही. त्याचवेळी पथक दुकानात पोहोचले. डमी ग्राहकाने दिलेले ९ हजार रुपये गल्ल्यातील ताब्यात घेण्यात आले. तपासणीत या वाणाचे आणखी पाच पॅकेट देखील जप्त करण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






