
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरूंच्या रिक्त जागेसाठी सार्वजनिक जाहिरात न देता ही प्रक्रिया राबविली जात आहे. परिणामी या पदासाठी पारदर्शक व गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया सुनिश्चितीवर संशय व्यक्त केला आहे. संविधानाच्या १४ आणि १६ या कलमांच्या संवैधानिक तरतुदीनुसार सार्वजनिक रोजगारात समान संधीची हमी असून ती पूर्ण करावी, अशी मागणीवजा तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि व्यवस्थापन मंडळाला एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव १२ जून रोजी सादर केला आहे.
डॉ. प्रसाद यांच्या विस्तृत पत्रात या पद्धतीचे अनेक फायदे दर्शविले आहेत. यात विद्यापीठाची अखंडता, विश्वासार्हता व प्रतिष्ठा वाढवणे समाविष्ट आहे. प्र-कुलगुरू पदासाठी सार्वजनिक जाहिरात देऊन निवड प्रक्रिया नेहमीच न्याय्य असेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रक्रियेमुळे सरकारी मानकांशी अनुरूपता आणि सार्वजनिक विश्वासदेखील टिकवून ठेवले जाईल. भरती प्रक्रिया खुली व स्पर्धात्मक असणे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे सर्वोत्तम प्रतिभा आकर्षित करण्यास मदत होते. तसेच देशाच्या विविधता व समावेशनाच्या प्रतिबद्धतेला समर्थन दिले जाते, असे डॉ. प्रसाद म्हणाले. त्यांनी या विचारांना बळकटी देण्यासाठी नुकत्याच झालेल्या जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला, ज्याने संविधानातील तत्त्वांशी अनुरूप अशा पद्धतीची गरज अधोरेखित केली आहे. त्यावर चर्चा अपेक्षित आहे.
व्यवस्थापन परिषदेची शुक्रवारी बैठक प्र-कुलगुरू भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने शुक्रवार, १४ जून रोजी व्यवस्थापन परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते हे प्र-कुलगुरू पदासाठीच्या नावावर ‘मॅनेजमेंट मध्ये शिक्कामोर्तब करून घेतील, असे संकेत आहेत. मात्र डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या भरती प्रक्रियेवर आक्षेप नोंदवीत सार्वजनिक जाहिरात देऊन या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शुक्रवारी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंकडून सादर होणाऱ्या नावावर एकमत होते की हा प्रस्ताव फेटाळला जातो? याकडे नजरा लागल्या आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






