
अमरावती : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास अशा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.
बारावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या; परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना?योजनेंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- * चिंचवड, नागपूर, अमरावती अशा विविध ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६० हजार रुपये भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत सन २०२४- २५ या वर्षातील अर्ज इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
– माया केदार, सहायक संचालक, मागास बहुजन समाज कल्याण २० ऑगस्टपर्यंत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी उच्च शिक्षणाच्या व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्जाची मुदत २० जून ते १५ जुलै असून, निवड यादी १ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
ही कागदपत्रे लागणार सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, अनाथ असल्यास महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, स्वयंघोषणापत्र तसेच कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र आवश्यक आहे.
पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार? या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्त्याची रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






