
अमरावती : आरटीई ऑनलाइन प्रवेश २०२४-२५ साठी ७ जून रोजी सोडत जाहीर करण्यात आली. सोडतीनंतर सहा दिवस उलटूनही अद्याप पालकांना मेसेज गेलेले नाही. विदर्भवगळता इतर जिल्ह्यांत शनिवारपासून सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होणार आहेत, तर विदर्भातील शाळा मात्र १ जुलैपासून सुरू होणार आहेत. अशातच शैक्षणिक सत्र सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आरटीईमध्ये पाल्याचा प्रवेश अद्याप निश्चित नसल्याने पालकवर्ग हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात एकूण १३१ शाळांची आरटीईसाठी निवड झाली आहे. यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेस खूपच उशीर झाला आहे. प्रवेशप्रक्रियेसाठी या वर्षी ६ हजार ३६६ अर्ज आले आहेत. प्रवेशप्रक्रियेची ७ जून रोजी सोडत झाली. सोडत झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थीच्या त्यांनी दिलेल्या मोबाइल नंबरवर मेसेज येऊ लागतील, असे सांगितले. मात्र, आठ दिवस झाले पालक दररोज मेसेजची वाट पाहत आहेत; पण मेसेज आले नाहीत. आरटीईच्या प्रवेशाविषयी कोणत्याही सूचना मिळत नसल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व कामे सोडून मेसेजकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. पालकांना मदतीसाठी हेल्पलाइन नसल्यामुळे कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. पालकांनी मेसेज आल्यानंतर प्रवेशासाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन आरटीई कागदपत्र पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी करून प्रवेशपत्र घेऊन नंतर शाळेकडे जाणे, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. मात्र, मेसेज न आल्याने पालकांना प्रवेशबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालक प्रवेशासाठी मेसेजच्या प्रतीक्षेत लागली आहे.
आरटीई संकेतस्थळावर मेसेज आरटीई प्रवेशप्रक्रियेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे सन २०२४-२५ वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. संकेतस्थळावर मेसेज दिसत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






