पुन्हा पेटला राणा विरुद्ध कडू वाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : नवनीत राणा यांच्या सारख्या सक्षम खासदाराचा पराभव कसा झाला, याचे आत्मचिंतन सुरू आहे. मात्र, ज्यांनी सुपारी घेऊन अमरावती लोकसभेत उमेदवार उभे केले. त्या ‘ब्लॅकमेलर’ आमदार बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातील जनता धडा शिकवेल. कारण आंदोलनातून तोडपाणी करणे हा त्यांचा धंदा असल्याची बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.

नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच आयोजित पत्रपरिषदेतून रवी राणा यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर प्रहार केला. त्यांच्या मते, बच्चू कडू महायुतीमध्ये नव्हते. म्हणूनच त्यांनी महायुतीच्या विरोधात उमेदवार उभा केला. आता बच्चू कडू हे महायुतीला विधानसभा निवडणुकीत २० जागा

मागून ‘ब्लॅकमेल’ करीत आहेत. मी हमालाचा मुलगा आहे, त्यामुळे मी निवडणूक जिंकलो वा हरलो याची मला चिंता नाही. जनता जेव्हा ठरवेल तेव्हाच माझा पराभव होईल. कोणाच्या सांगण्यावरून माझा पराभव होणार नाही, असा टोलाही आमदार राणा यांनी लगावला.

बडनेरा मतदारसंघातूनच आपण युवा स्वाभिमान पक्षाकडून आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. मी आगामी विधानसभा निवडणुकीत पाडा-पाडीचे राजकारण करणार नाही. नवनीत राणा यांच्यासाठी सर्वच भाजपच्या लोकांनी काम केले ही बाब त्यांनी स्पष्ट केली. तसेच नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचेही आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. यावेळी पत्रपरिषदेला युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी हजर होते.

 

काँग्रेस नेत्यांचे गायिले गोडवे जिल्हाच्या विकासासाठी खासदार बळवंत वानखडे यांना साथ देऊ, असे जाहीर करताना आमदार रवी राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत आदींचे गोडवे गायिले. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. मात्र आमदार सुलभा खोडके, संजय खोडके यांनी सोयीचे राजकारण केले, असा आरोप त्यांनी केला.
तोंड सांभाळले असते तर चित्र वेगळे असते – कडू आमदार रवी राणा यांनी तोंड सांभाळले असते तर नवनीत राणा या लोकसभा निवडणूक जिंकल्या असत्या, असा पलटवार आमदार बच्चू कडू यांनी केला. नवनीत राणा या खासदार असताना रवी राणा हे कुठेच ‘पिक्चर’मध्ये दिसत नव्हते. राणा दाम्पत्यामधील अंतर्गत कलह समोर येत असल्यामुळेच त्यांना पत्रपरिषद घ्यावी लागली, असेही ते म्हणाले. १०८ वेळा बच्चू कडू यांचे नाव घ्यावे लागले. रवी राणांचे मानसिक संतुलन बरोबर नाही. मला वाटलं नव्हतं एवढे झोंबले असेल म्हणून. मी चार वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो. कुणाच्या पाठिंब्यावर निवडून आलो नाही.
रवी राणासोबत काही वाद नव्हता.. मात्र त्यांनी तोंड सांभाळून वागले असते तर नक्कीच नवनीत राणा या जिंकल्या असत्या असेही आमदार कडू म्हणाले. आमदार रवी राणा यांनी केलेले आरोप हे काही नवीन नाहीत. मात्र या आरोपांविषयी आता न्यायालयातून जाब विचारला जाईल. दोन ते तीन दिवसात राणांच्या आरोपावरुन कोर्टात प्रकरण दाखल करु, यापुढे सर्वच बाहेर काढू. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव त्यांनी स्वीकारला असला तरी त्यांच्या जिव्हारी लागल्याचे माझ्यावरील आरोपावरून दिसून येते, असे आमदार बच्चू कडू प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!