
अमरावती : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा छत्रीतलावात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ती घटना उघड झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकाने ते दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. शेख उमर लिलगर मेहबूब लिलगर (१९) व अयान शहा राजीक शहा (१६, दोघेही रा. कुंभारवाडा, फ्रेजरपुरा) अशी मृतांची नावे आहेत.
बकरी ईद साजरी करून ते एकाच परिसरात राहणारे दोघेही पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. काही प्रत्यक्षदर्शीनी ती माहिती पोलिस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. दुपारी १:४० च्या सुमारास दोन युवक बुडाल्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथक दुपारी दोनच्या सुमारास छत्रीतलाव येथे पोहोचले. तत्काळ रेस्क्यू टीममधील गोताखोरांनी गळ व हूकच्या साहाय्याने शोधकार्याला सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह पथकाच्या हाती लागले. ते मृतदेह पीएमसाठी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
यांनी केले रेस्क्यू निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथकातील सचिन धरमकर, दीपक डोरस, दीपक पाल, गजानन वाडेकर, विशाल निमकर, दिलीप भिलावेकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव यांनी दोघांचे मृतदेह छत्रीतलावाबाहेर काढले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






