
अमरावती : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. जिल्ह्यातही हा बंद पाळण्यात येणार होता. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शहरातील राजकमल चौकात महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व नेत्यांनी एकत्र येत मौन आंदोलन केले. यावेळी महिला-पुरुष पदाधिकाऱ्यांनी काळे पोषाख तर काहींनी काळी पट्टी बांधून बदलापूर घटनेचा निषेध नोंदविला.
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट पहायला मिळत आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसून महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. उच्च न्यायालयाने मात्र या बंदला नकार दिला. त्यामुळे राज्यात बंद न पाळता सर्वत्र मौन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातही राजकमल चौकात महाविकास आघडीच्या नेत्यांनी एकत्र येत मौन आंदोलन केले. या आंदोलनातून राज्य शासनाचा निषेध नोंदवत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजीमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी महापौर विलास इंगोले, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी आ. ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख प्रीती बंड, शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, भैय्या पवार, जयश्री वानखडे, किशोर बोरकर, नीलेश गुहे, वैभव देशमुख, सागर देशमुख, कोमल बोथरा, संजय वाघ, आनंद भमोरे, बाळासाहेब भुयार, सचिन हिवसे, नितीन कदम, प्रशांत वानखडे, हाजी नजीर खान, अभिनंदन पेंढारी, डॉ. सुजाता झाडे, शोभा शिंदे, वंदना थोरात, अनिला काझी, शिरीन खान, कीर्तीमाला चौधरी यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढीव मालमत्ता कर मागे घेण्याची मागणी अमरावती महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर वाढवून सर्व सामान्य नागरिकांवरील आर्थिक बोजा वाढविला आहे. त्यामुळे वाढीव मालमत्ता कराचा निर्णय देखील मागे घेण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मौन आंदोलनातून केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






