
अमरावती : जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत कधी दमदार, कधी तुरळक स्वरूपात पाऊस पडतो. सध्याही पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या पावसाच्या जोरदार सरी मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक जाणवतात. मेळघाटात मुसळधार पावसामुळे रस्ते, रपटे, पूल व पुरामुळे वाहून जातात. त्यामुळे बरेचदा अनेक गावांचा संपर्क तुटतो. रस्ते, पूल वाहून गेल्याने दळणवळणाचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. परिणामी रस्ते नादुरुस्त असल्याने एसटी बसही संबंधित गावात नियमितपणे जाऊ शकत नाही. त्यामुळे एसटी बसने प्रवास करण्यासाठी अनेकांना पाच किलोमीटर पायपीट करावी लागते.यंदाच्या पावसाळ्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील झिलांगपाटी या गावाला जाणारा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे या गावात नियमित जाणारी एसटी महामंडळाची धारणी ते झिलांगपाटी ही बसफेरी या मार्गावरील मोगर्दा गावापर्यंत जात आहे. त्यामुळे झिलांगपाटी या गावातील आदिवासी बांधव व विद्यार्थी यांना शाळा व कामानिमित्त तालुक्याला जायचे झाले, तर साडेपाच कि.मी. पायपीट करावी लागते.
झिलांगपाटी रस्ता खराब असल्यामुळे बस मोगर्दापर्यंत येत आहे. या रस्त्याच्या बांधकामाची निविदा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर झाले असून आमदारांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू होणार आहे.
– जगदीश हेकडे (मोगर्दा), माजी उपसभापती, धारणी पंचायत समिती
आमच्या गावापर्यंत एसटी सेवा सुरू होती. परंतु, रस्ता खराब झाल्यामुळे एसटी बंद आहे. त्यामुळे गैरसोय होत आहे. धारणी मुख्यालयी कामासाठी जाण्यात अडचण निर्माण होत आहे. शासनाने लवकर रस्ता दुरुस्त करून एसटी बसफेरी सुरू करावी.
रामसिंह सावलकर (झिलांगपाटी), माजी सभापती, पंचायत समिती
शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास मोगर्दा ते झिलांगपाटी रस्ता खराब असल्याने एसटी बस बंद आहे. त्यामुळे धारणी ते झिलांगपाटी एसटी बस ही मोगर्दापर्यंत येते. त्यामुळे झिलांगपाटी येथील शालेय विद्यार्थ्यांना मोगर्दा गावापर्यंत पायपीट करीत जावे लागते.
धारणी ते झिलांगपाटी या गावाला जाणारा रस्ता पावसामुळे अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे झिलांगपाटी गावाला जाणारी एसटी बस ही मोगर्दा गावापर्यंत जाते. पुढे साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या झिलांगपाटी गावापर्यंत रस्त्याअभावी बस जाऊ शकत नाही. रस्ता दुरुस्त झाल्यावर ही बस नेहमीप्रमाणे संबंधित गावापर्यंत सुरू होईल.
मंचक लहाने,– बसस्थानक प्रमुख, धारणी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






