दर्यापूर येथे “आमचा कचरा आमची जबाबदारी” अभियानांतर्गत जनजागृती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर/अंजनगाव सुर्जी :
दैनंदीन जीवन जगत असताना विविध कार्य, कृतीतून आपणाद्वारे निर्मित अनावश्यक गोष्टी ज्या कचरा म्हणून संबोधिल्या जातात, त्या कचर्याची यशस्वीपणे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या आरोग्य विषयक मोलाच्या कार्यात सर्वांनी सातत्याने योगदान दिल्यास संपूर्ण स्वच्छ राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे आवाहन दर्यापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नंदु परळकर यांनी केले.
स्थानिक प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे “माझा कचरा; माझी जबाबदारी” या नगर परिषद दर्यापूरद्वारा स्वच्छता अभियान मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नगर परिषद दर्यापूरद्वारे स्वच्छता उपक्रमा अंतर्गत ब्रँड अँबेसिडेर म्हणून नियुक्त स्थानिक गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी दैनंदीन जीवनात आपल्याद्वारे निर्मित होणारा कचरा यासाठी वर्गीकरण, पुनर्वापर व पुनर्चक्रण याबत सखोल मार्गदर्शन केले. प्रा. भारसाकळे हे याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने व ते या अभियानाचे ब्रँड अँबेसिडेर नियुक्त झाल्याने प्रबोधन विद्यालयाने त्यांचा कार्यक्रमा दरम्यान यथोचित सत्कार केला. स्वच्छता संकल्पना राबविणारे कर्तव्यदक्ष अधिकारी दर्यापूर नगरीला लाभल्याबाबत मुख्याधिकारी परळकर यांना संपूर्ण दर्यापूर नगरीच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणांतून उपक्रम विषयांवर संवेदनाशील भाष्य करून उपक्रमाचा शुभारंभ व समारोप यासाठी प्रबोधन विद्यालयाची निवड केल्याबाबत नगर परिषद दर्यापूर कार्यालयाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य नरेंद्र गोंडाणे, शिक्षक अरविंद हाडोळे यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. उपस्थित सर्व मान्यवरांना विद्यालयातील विद्यार्थीनींनी राखी बांधून रक्षाबंधन सोहळाही साजरा केला. मुख्याधिकारी परळकर यांनी या अभियानाअंतर्गत नगर परिषद दर्यापूर यांचे वतीने स्थानिक विद्यार्थ्यासाठी वर्गवार संपन्न होणाऱ्या प्रश्नमंजुषा, चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजन व बक्षिसे तसेच सुंदर शाळा प्रतियोगीतेबाबत माहिती दिली. प्रास्ताविक करून संचालन निखिल बुंदेले यांनी तथा आभार नगर परिषद शहर समन्वयक ऐश्वर्या भोगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी नगर परिषद नोडल अधिकारी सुमेद खिराळे, आरोग्य निरीक्षक सुशिल मार्वे, नगर परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व प्रबोधन विद्यालयाच्या सहकार्याने पूर्ण केली. हे अभियान एकूण 29 शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!