
अमरावती : नांदगाव पेठ हद्दीतील दोन फ्लॅट फोडून चोरांनी सुमारे ४.६४ लाख रुपयांचा मुद्देमाल साफ केला आहे. त्यामुळे शहरातील आऊडस्कर्ड चोरांनी लक्ष्य केल्याचे प्रत्ययास आले आहे. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री दोन एफआयआर दाखल केले आहेत. यातील एक घटना जावरकर लॉनमागील गीता रेसीडन्सीमध्ये तर दुसरी घटना वल्लभनगरस्थित मारोती रेसीडन्सीमध्ये घडली आहे. गीता रेसिडंसीमधील रहिवासी उदय मोरे हे १५ ऑक्टोबर रोजी सदनिकेला कुलूप लावून परतवाडा येथे ड्यूटीकरिता गेले होते. तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना फ्लॅटच्या दाराचा कोंडा तुटलेला दिसला. तर, ७८ हजार रुपये रोख व ५ व ७ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण १.४८ लाख रुपयांचा ऐवज दिसून आला नाही.
३.२६ लाखांचा मुद्देमाल लांबविला वल्लभनगर येथील नीलेश अडगोकार व त्यांची पत्नी १६ ऑक्टोबर रोजी ड्यूटीवर गेले. ते दुपारी मुलांना घेऊन घरी आले असता फ्लॅटचा कडी कोंडा तुटलेला दिसला. तर बेडरूममधील आलमारीतील लॉकरमधील ३.२६ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. चोराने २८ ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची अंगठी, १५ ग्रॅमचा गोफ, सोन्याचे पदक असे एकूण ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने व २ हजार रुपये रोख रक्कम लांबविली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







