आचारसंहितेच्या नावावर मानसिक त्रास असह्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

परतवाडा: विधानसभा आचारसंहितेच्या नावावर निवडणूक आयोगाच्या पथकासोबत पोलिस प्रशासनाकडून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते, व्यापाऱ्यांची तपासणी होत आहे. या कारवाईला तीव्र विरोध दर्शवित प्रशासनाने शेतकरी हिताला न्याय देण्याची मागणी निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांना अडते, व्यापाऱ्यांनी केली. याविरोधात २० नोव्हेंबरपर्यंत बाजार समितीमधील खरेदीच बंद करण्याच्या मनस्थितीत ते आले आहेत.

यातून मोठ्या प्रमाणात गोरगरीब शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती असून येथे मेळघाटच्या धारणी चिखलदऱ्यासह अचलपूर व आजूबाजूच्या तालुक्यातून हजारो क्विंटल धान्य विक्रीला दररोज येते. बाजार समितीमध्ये ५० ते ६० अडते व्यापाऱ्यांची संख्या आहे. आठ ते दहा व्यापारी मोका खरेदी करीत आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यातून होत आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली जाते. त्यामुळे इतरत्र जुळवाजुळव करून बँकेतून आणलेली रक्कम काढताना बँकेबाहेरच त्यांचे छायाचित्र काढणे तपासणीच्या नावावर रक्कम जप्त करण्यासारखे प्रकार सुरू आहे. अडते व्यापारी रक्कम काढून नेमके नेतात कुठे शेतकऱ्यांना देतात किंवा आचारसंहितेचा भंग करीत आहे का, हे ना तपासताच थेट कारवाई केली जात आहे. दरोडेखोरांसारख्या मिळणाऱ्या वागणुकीविरोधात अडते, व्यापारी संतप्त झाले आहेत. निदान अडते, व्यापाऱ्यांना यातून सूट देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे अचलपूर उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना करण्यात आली. आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

 

व्यापारी-अडत्यांना त्रास देणे योग्य नाही. गोरगरीब शेतकरी मेळघाट व मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे अडते- व्यापारी आचारसंहितेचा भंग करीत नसून ते आपला व्यवसाय करीत आहेत. सहकार्य करण्याची अपेक्षा प्रशासनाकडून सुद्धा आम्हाला आहे.

– सतीश व्यास, संचालक, बाजार समिती अचलपूर

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!