
अमरावती : महानगरपालिका व महसूल आयुक्तालयाचे विभागीय केंद्र असलेल्या अमरावती विधानसभा मतदारसंघात यंदा देखील मागील निवडणुकीप्रमाणे परंपरागत लढत होत आहे. तब्बल १८ हजार २६८ मताधिक्य घेऊन सन २०१९ मध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला. मतदारसंघ बदलवत पहिल्याच प्रयत्नात त्या काँग्रेसकडून अमरावतीच्या आमदार झाल्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत सुलभा खोडके या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे. या दोघांव्यतिरिक्त अमरावतीत मनसे, भाजप बंडखोर व पश्चिम क्षेत्रातील उमेदवारांचा करिश्मा चालणार का? हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.
यंदाच्या एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे शहराच्या पश्चिम क्षेत्रात ‘अब की बार मुस्लिम आमदार’ ची घोषणा देण्यात आली. काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी देखील झाली. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे यंदा पश्चिम क्षेत्रातील गठ्ठा मतदान नेमके कुणाच्या पारड्यात जाते, यावर महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांचे विजयाचे समीकरण ठरणार आहे. सोबतच पश्चिम क्षेत्रातील मते मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे महायुती व महाआघाडीपैकी कुणाला मतविभाजनाचा फटका सहन करावा लागतो, हे देखील तूर्तास अनुत्तरित आहे. पाच वर्षांपूर्वी पंजाला गठ्ठा मतदान झाले होते. यंदा तो पंजा डॉ. सुनील देशमुखांकडे आहे. तर, सुलभा खोडके या घड्याळ चिन्हावर रिंगणात उतरल्या आहेत. सुलभा खोडके यांच्या प्रचारासाठी शहर भाजपने नियोजनबद्ध प्रचार चालविला असून, काँग्रेसच्या उमेदवाराला देखील उद्धवसेनेची साथ मिळाली आहे. तर दुसरीकडे स्थानिक भाजप जगदीश गुप्तांविरोधात ताकदीने उतरली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







