
चिखलदरा : तालुक्याच्या काटकुंभ,चुरणी परिसरातील ३९ पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांची कुसुम योजनेंतर्गत सोलर पंपासाठी ससेहोलपट सुरू आहे. अनेकदा तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोलर पंप मिळण्याच्या हमीपोटी त्यांनी गहू आणि चण्याची पेरणी केली. परंतु, उसनवारीने भरलेल्या पैशांमधून सोलर पंपाऐवजी मागील १६ महिन्यांपासून मनस्ताप सोसावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा खेळखंडोबा नेहमीचा आहे. अशात शासनाच्या कुसुम सौर योजनेअंतर्गत सोलर पंप बसविण्यासाठी अनुदान दिले जाते.
काही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. त्यानुसार चिखलदरा तालुक्याच्या काटकुंभ, चुरणी परिसरातील ३९ पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांनी आर्थिक क्षमता कमकुवत असतानाही उसनवारी करून व घरातील दागदागिने गहाण ठेवून सोलर पंपासाठी आवश्यक ती रक्कम भरली. त्यानंतर मेडाच्यावतीने संबंधित कंपनीला शेतकऱ्यांच्या नावाची यादी पाठवून सोलर पंप बसवण्यासंदर्भात सांगण्यात आले. परंतु, १६ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा सोलर पंपासंदर्भात जबाबदार असलेले मेडा किंवा संबंधित कंपनीचे अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार काटकुंभ येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
आर्थिक मनस्ताप, प्रचंड संताप कुसुम सौर योजनेअंतर्गत आवश्यक असलेली रक्कम शेतकऱ्यांनी भरली. रक्कम भरताना शेतीचे भरघोस उत्पादन घेता येईल, हे स्वप्न होते. त्यासाठी घरातील दागदागिने कोणी उसनवारी करून तर व्याजाने रक्कम गोळा करून भरली. परंतु, मागील दीड वर्षापासून आदिवासी शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदने आणि अधिकाऱ्यांना मोबाइलवर संपर्क करूनही कुणीच दखल घेत नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे.
गहू, चणा ओलित कसे करणार?सोलर पंप आज मिळेल, उद्या मिळेल, या अपेक्षेवर त्यांची बोळवण आणि कार्यालयाच्या चकरा मारून ससेहोलपट झाली. गहू आणि चण्याची पेरणी केल्याने तोपर्यंत तरी सोलर मिळण्याची अपेक्षा होती. परंतु आता पैसे भरूनही वेळेवर सोलर पंप उपलब्ध होऊ शकत नसल्याने पेरलेले पीक या आदिवासी शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







