
अमरावती : महायुती सरकारने अगोदर अनेक विकासाचे कामे केली असून येत्या काळातही ती आणखी वेगाने केली जातील. विशेषतः येत्या काळात अमरावतीत आयटी पार्क स्थापनेसह रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या जातील. त्याकरिता महायुती सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भाजपाचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवराय कुळकर्णी बोलत होते.
भारतीय जनता पार्टीने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेचा कौल दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या महायुतीने संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातही ठोस विश्वासाने वाटचाल सुरू केली महाराष्ट्र हे मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आघाडीतील पक्षांनी कंबर कसली आहे, आणि तेच पक्ष आता संविधानाच्या नावाने कोरे कागद दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करत आहेत. यावेळी शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, चेतन पवार, बैतुल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजा भैया पटेल, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, किरणताई महल्ले, सतीश करेसिया, धनराज चक्रे, सुरेखा लुंगारे, मिलिंद बांबल, श्रद्धा गहलोत, रश्मी नावंदर, लखन राज, विवेक कलोती आदी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







