
अमरावती : केवळ विकासाच्या बाता करीत व्हिजन नसलेले प्रस्थापित नेते अमरावतीकरांना गृहीत धरून आपली विचारधारा धाब्यावर ठेवून लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतात. तेच प्रस्थापित आळीपाळीने अमरावतीवर राज्य करीत घराणेशाहीला बळ देतात. अशाप्रकारे तुम्हाला गृहीत धरून आपली राजकीय पोळी शेकणाऱ्या प्रस्थापितांना अमरावतीकर जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून देत आपला हक्क व अधिकाराची ताकद दाखवून देण्याचे आवाहन मनसे उमेदवार पप्पू पाटील यांनी करीत परिवर्तन घडविण्याची विनंती केली.
अमरावती विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार पप्पू ऊर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ अर्जुननगर भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत पप्पू पाटील यांनी आपली भूमिका
विशद करून विविध विषयांवर भाष्य केले. शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने अमरावतीसाठी भरीव असे कार्य केले नाही. या नेत्यांनी भाऊसाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेतला नाही. एकही मोठा उद्योग अमरावतीत आणू शकले नाही. परिणामी अमरावती शहरातील ६० टक्के मुलं मुली पुणे-मुंबईला नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत.
एखादा आयटी प्रोजेक्ट अमरावतीमध्ये उभा असता तर ही मुले आपल्या येथेच राहिली असती; पण तसेच झाले नाही. या ठिकाणी तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना विकासाची दृष्टी नसून कोणतीही विचारधारा नसलेले हे प्रस्थापित केवळ मतांसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप पप्पू पाटील यांनी जाहीर सभेत केला. अमरावतीकरांनो, आता वेळ आली आहे, तुम्हाला गृहीत धरून राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांना येत्या २० तारखेला त्यांची जागा दाखवून देण्याची. तेव्हा समस्त अमरावतीकरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावीत मनसेच्या रेल्वे इंजिनसमोरील बटण दाबून केवळ अमरावतीच्या विकासासाठी एकवेळ संधी द्यावी, अशी विनंती पप्पू पाटील यांनी केली.
राज ठाकरे हिंदुत्वाचे ब्रँड : पंडित सर मनसेप्रमुख राज ठाकरे हे स्पष्टवक्ते असून, त्यांची भूमिकादेखील नेहमी स्पष्ट राहिली आहे. त्यांनी हिंदुत्वाबद्दल घेतलेली भूमिका कट्टर हिंदुत्ववादी आणि आमच्यासारख्या हिंदूप्रेमींना पटली असून, आजच्या घडीला राज ठाकरे हे हिंदुत्वाचा ब्रँड असल्याचे मत सभेला उपस्थित पंडित सर म्हणाले. हिंदुत्याच्या या बँडला बळ देण्यासाठी पप्पू पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन पंडित सर यांनी जाहीर सभेत केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







