
तिवसा : विधानसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख १ हजार ४१२ मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा मतदारसंघांतून ६४ टक्के मतदान झाले होते, तर विधानसभेसाठी तिवसा मतदारसंघात ६७.९३ टक्के मतदान झाले.
एकूण २ लाख ९६ हजार ४९५ मतदारांपैकी मतदानात १ लाख ७ हजार ४५८ पुरुष मतदार व ९३ हजार ९५४ महिला मतदारांनी सहभाग घेतला. मतदारसंघातील ३१९ मतदान केंद्रांवर अतिशय शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढल्याने काही मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले. तिवसा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असून सद्यस्थितीत सर्व उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलबंद झाले आहे. येत्या २३ तारखेला विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







