
अमरावती : यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे ३६,८४१ हेक्टरमधील संत्र्याची फळगळ व ५४४ हेक्टरमधील लिंबूचेही नुकसान झाले आहे. यासाठी ३६ हजार रुपये हेक्टर या ‘एनडीआरएफ’च्या निकषाने १३४.६२ कोटींची मागणी १० ऑक्टोबरला शासनाकडे करण्यात आलेली आहे.
संत्रा उत्पादकांसाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाने पाठविला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजनेचे अनुदान शासनाने वितरित केले. मात्र, संत्रा उत्पादकांचा शासनाला विसर पडला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे संत्र्याच्या बागेत पाणी साचल्याने बुरशीजन्य रिंग व तसेच किडीमुळे संत्र्याची गळ झाली. प्रतिकूल परिस्थिती व कीड व रोगामुळे जिल्ह्यात ४२ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. संत्रा उत्पादकांनी आवाज उठविल्यानंतर शासन प्रशासनाला जाग आली व फळगळीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला दिले. प्राथमिक अहवालात ५० हजार हेक्टरवर तर पंचनाम्याअंती ३७,३९३ हेक्टरमध्ये संत्रा व लिंबू पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात लिंबूचे सर्वाधिक ५४० हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने १० ऑक्टोबरला संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला होता.
बाधित क्षेत्र अन् अनुदानाची मागणी अहवालानुसार मोर्शी तालुक्यात २३.०३ कोटी (६३९७ हेक्टर), चांदूर रेल्वे ३.७० कोटी (१०२८ हे.), भातकुली २.५९ लाख (७.२० हे), चिखलदरा २५.४९ लाख (७०.८१ हे.), तिवसा २०.४६ कोटी (२९०८ हे.), वरूड ७७.०५ कोटी (२१४०२ है.), अमरावती ३.३१ कोटी (९२२ हे.), अंजनगाव सुर्जी १२.१५ कोटी (३३७५ हे.), धामणगाव रेल्वे ३.७० कोटी (१०२६ हे.), नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९२.२६ लाख (२५६ हे.) अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







