
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात यंदाच्या ११ महिन्यांत २१ सापळे यशस्वी केले. त्यात एकूण २८ जणांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती एसीबीने यंदा २१ ट्रॅपसह निम्न पेढी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत अपसंपदेचा गुन्हादेखील दाखल केला आहे.
कुठलाच जिल्हा, कुठलेच शहर वा कुठलाही प्रशासकीय विभाग त्या लाचखोरीला अपवाद नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणेच, लाचखोर तितक्या पद्धती म्हणाव्यात, अशी लाचखोरीची नानाविध कारणे समोर आली आहेत. गटविमा प्रस्तावाची नोटशिट तयार करण्यासह, विनंती बदली, प्रशिक्षण बिल मंजूर करणे, सातबाऱ्यावर नाव चढविणे, योजनेचा लाभ, पोलिस स्टेशन हद्दीत विनासायास अवैध धंदे चालू ठेवण्याकरिता, गुन्ह्यात जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी, चेकवर सही घेण्यासाठी, कामाचे बिलाचे कमिशन, फेरफार आदेश, वारसा हक्क प्रमाणपत्र देण्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी देखील लाच घेतली गेली. एक तलाठी तर ४० रुपयांसाठी ट्रॅप होऊन निलंबित झाला.
कोण सापडले लाचखोरीत जिपच्या शिक्षण विभागातील कनिष्ट सहायक, प्रभारी गटशिक्षणाधिकारी व गट समन्वयक, कोतवाल, मंडळ कृषी अधिकारी, पोलिस शिपाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान, सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, न्यायालयीन लिपिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचा विभागीय अधिकारी व कनिष्ठ अभियंता, तीन तलाठी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक, समाजकल्याणमधील सहायक लेखाधिकारी, मुख्याध्यापक, महावितरणचा कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ऑपरेटर, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक, पीएचसीतील कनिष्ठ सहायक व दोन पोलिस कॉन्स्टेबल.
२.८० लाख रुपयांची लाचखोरी अमरावती जिल्ह्यातील एकूण २१ ट्रॅपमधील लाच घेतल्याची वा मागितल्याची रक्कम २ लाख ८० हजार २४० रुपये इतकी आहे. त्या २१ ही प्रकरणात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच प्रकरणे तपासाधीन, तर काही प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झालेत. काही प्रकरणांना अभियोगपूर्व मंजुरी प्राप्त झाली, तर त्यातील काही प्रकरणे ही अभियोगपूर्व मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
अमरावती परिक्षेत्रातील प्रत्येक तक्रारीचे निवारण केले जाते. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी लाचखोरी थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. दोषारोपपत्र दाखल करणे व अभियोगपूर्व कामांची गती वाढविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. लाच घेणे व देणे दोन्हीही गुन्हा आहे.
– मारुती जगताप, पोलिस अधीक्षक, एसीबी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







