
वरूड : नांदगावपेठ ते मध्य प्रदेश वर्धा बेरिअरपर्यंत सिमेंट काँक्रीटचा तीन पदरी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ के हा २०१८ साली पूर्ण झाला. परंतु, वन विभागाच्या हद्दीत रस्ता अपूर्ण राहिला, तर कुठे तडे गेलेल्या रस्त्याची डागडुजी सुरू आहे. यामुळे हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरला आहे. पुसलानजीक असलेला अपूर्ण वळण रस्ता मृत्यूचा सापळा ठरला आहे. शेकडो निष्पाप लोकांचे बळी जाऊनसुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभाग आणि आमदार-खासदारांनी अनेकवेळा दिलेली आश्वासने हवेत विरली. या रस्त्याच्या अद्ययावतीकरणासाठी आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.मध्य प्रदेश सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ के हा तीन पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाला. परंतु, अल्पावधीत रस्त्याला भेगा पडल्या. वन विभागाच्या हद्दीत रस्ता तयार करताना निर्बंध लादल्याने काम अपूर्ण राहिले. पुसला काष्ठ आगारा पासून ते रेल्वे गेटपर्यंतच्या वळण रस्त्यावरून एकेरी सिमेंट रस्ता धावपळीत झाला.
अर्धवट रस्त्यामुळे रस्त्यावर सहा वर्षांत शेकडो निरपराध दुचाकी- चारचाकी वाहनचालकांसह प्रवाशांचे बळी गेले. याबाबत चक्का जाम आंदोलन, उपोषण झाले तरी अपघातांची श्रृंखला सुरूच आहे. गेल्या शुक्रवारी एकाच दिवशी दोन अपघात झाले आणि एका तरुण चालकाचा मृत्यू झाला. वनक्षेत्र असल्याने वन विभागाने या रस्त्याच्या बांधकामाला सक्त मनाई केली. काही सेवाभावी लोकांनी स्वखर्चाने मुरूम टाकण्याची तयारी केली असता, कारवाईची धमकी दिली.
चक्का जामची फलनिष्पत्ती नाही २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नीलेश डोंगरे या ३४ वर्षीय तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करून चक्का जाम आंदोलन केले होते. त्यानंतर नागरिकांची आश्वासनाने बोळवण करण्यात आली. तथापि, काहीही प्रगती नसल्याची खंत पुसला येथील सरपंच धनराज बमनोटे यांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशाता त्यांनी दिला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







