
धारणी: मेळघाटात रोजगाराची भीषण समस्या असल्यामुळे दरवर्षी हजारोंच्या 2024 संख्येने मजुरांचे मेळघाटाबाहेर स्थलांतरण होत असते. याबाबत शासन आणि प्रशासन दोघांना पूर्णपणे माहिती असतानासुद्धा स्थलांतरण होऊच नये, यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व उपाययोजना दरवर्षी अपयशी ठरतात. विशेष म्हणजे स्थलांतरित मजुरांचे त्यांच्या नियोजित जागेवर काम करताना किंवा प्रवासादरम्यान, कधी औषधोपचाराअभावी आकस्मिक मृत्यू होणे तर कधी अपघातात जीव गमावून बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या घटनांना कारणीभूत कोण? शासन की प्रशासन असा सवाल उपस्थित होत आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते अकोला दरम्यान धारणी तालुक्यातील चाकरदा या गावातील सात मजूर घेऊन जाणारी बोलेरो जीप गाडी उभ्या ट्रकमध्ये घुसल्यामुळे एकाचा मृत्यू झाला असून तीन गंभीर अवस्थेत अकोला येथे उपचार घेत आहेत. ही घटना गुरुवारी घडली होती. विशेष म्हणजे या घटनेमध्ये मजूर हरी भोमजी रामदास शेलेकर (३५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.
या अपघातात बिरजू खोच्चा मंगल धुर्वे, दीपक मोहनलाल सावलकर, धन्ना शंकर वाकोडे, राहुल रामकिसन कासदेकर, राजेश रामू धुर्वे हे जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. है सर्व मजूर बोअर मशीनमध्ये काम करण्यासाठी लातूर, उस्मानाबाद येथे जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
दिवाळीत गावी येताना अरविंदला मृत्यूने कवटाळले या अपघातात मृत्यू पावलेल्या हरिचा लहान भाऊ अरविंद रामदास शेलेकर (३०) हा दिवाळी दरम्यान कर्नाटक येथून गावाला परत येत असताना इंदूरजवळ त्याला मृत्यूने कवटाळले होते. त्याला पत्नी, एक मुलगा, दोन मुली अशा परिवार असून रामदास यांची दोन्ही मुले अपघातात मृत्यू पावल्यामुळे त्यांच्यावर भीषण संकट ओढवले आहे.
मेळघाटातील आदिवासी मजुरांबाबत माहिती मिळेना मेळघाटातून रोजगारानिमित्त बाहेर जाणाऱ्या मजुरांची नावे आणि ज्या ठिकाणी कामासाठी गेले तेथील काम उपलब्ध करून देणाऱ्याचे नाव आणि मोबाइल नंबर पोलिस पाटील किंवा गावातील प्रमुख व्यक्तीने नोंदवून घ्यावे, अशी सूचना असताना सुद्धा कोणत्याही गावांमध्ये मजुरांबाबत संख्या आणि कामानिमित्त गेलेल्या जागेबाबत माहिती उपलब्ध नसल्याची शोकांतिका आहे.
रोजगाराचा केवळ गाजावाजा जिल्हा प्रशासनाकडून मेळघाटात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा गाजावाजा केला जातो. कागदोपत्री मजुरांची संख्यासुद्धा दाखविण्यात येते. परंतु अशाप्रकारे होत असलेल्या घटनेमुळे प्रशासनाच्या या गाजावाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






