चांदूर रेल्वे नगरपरिषद पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या पंप हाऊसचा विद्युत पुरवठा महावितरणने शनिवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास खंडित केला. विद्युत देयक प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणकडून मिळाली असून, शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पंप हाऊसचा विद्युत पुरवठा २४ तासांच्यावर अजूनही खंडित आहे. रविवारी शहरवासीयांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. यावरून नगर परिषदेचा बेजबाबदारपणा समोर आला.

चांदूर रेल्वे शहराला सध्या मालखेड तलावावरून पाणीपुरवठा होत आहे. मालखेड तलावावरून पाणी शहरातील पंप हाऊस येथे जाते. येथून पाणी जलशुद्धिकरण केंद्रावर पाठविले जाते आणि तेथून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, पंप हाऊस येथील पाणीपुरवठा हा वीज देयके प्रलंबित असल्यामुळे महावितरणतर्फे खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे रविवारी शहरातील इंदिरानगर, मंगलमूर्तीनगर, गुलमोहर कॉलनी, मेहेरबाबा कॉलनी, को-ऑपरेटिव्ह बँक कॉलनी या भागात पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी चांदूर रेल्वे शहरवासीयांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. नगर परिषदेत नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी असताना २४ तासांच्या वर कधीही पाणीपुरवठा खंडित राहिला नाही. मात्र, स्थानिक नगर परिषदमध्ये २७ डिसेंबर २०२१ पासून संपूर्ण कारभार प्रशासकाकडे असताना प्रशासकाच्या काळात चांदूर रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच २४ तासांच्या वर पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित राहिला आहे, हे विशेष. त्यामुळे याला दोषी कोण? याचा वरिष्ठांनी तपास करणे गरजेचे झाले आहे.

 

५ लाखांच्या जवळपास विद्युत देयक प्रलंबित पंप हाऊसचे विद्युत देयक ५ लाखांच्या जवळपास प्रलंबित आहे. यासंदर्भात नगर परिषदेला सूचनासुध्दा दिली होती. यानंतर पंप हाऊसचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

– दीक्षांत कवाडे, सहायक अभियंता (शहर), महावितरण

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013560
error: Content is protected !!