
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बुधवार, १ मेरोजी सकाळी गळाभेट कार्यक्रमात १८ वर्षांखालील त्यांची मुले, मुली, नातू, नात यासह बहीण व भाऊ यांची भेट घडवून आणल्याने कारागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आप्तांना पाहताच अनेक बंद्यांनी अश्रूना वाट मोकळी केली. आप्तांनीही पुढच्या भेटीची अपेक्षा व्यक्त करीत जड अंतःकरणाने कारागृहातून निरोप घेतला.हातून कळत-नळत झालेल्या चुकांचे न्यायालयाच्या आदेशानुसार चार भिंतीच्या आत शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची दिनचर्या ही सूर्योदय ते सूर्यास्त अशीच असते. मात्र, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील मध्यवर्ती कारागृहात गळाभेटीचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षा भोगत असताना बंदिजन हे निराशेच्या गर्तेत जाऊ नये. त्यांच्यात सकारात्मकता आणि आपल्या कुटुंबाप्रति आपुलकी राहावी. मुलाबाळांपासून फार दूर असलेल्या बंदिजनांना त्यांना भेटता यावे, जवळून पाहता यावे. त्यांच्यात कौटुंबिक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मुलाबाळांना अनेक वर्षांनंतर पाहिल्याने बंदिजनांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. तर आपल्या वडिलांना भेटता आल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील द्विगुणित झाला होता. मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या वतीने बंदिजन आणि त्यांच्या परिवारातील सदस्य व लहान मुलांकरिता नाष्टा व जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. तब्बल ४० ते ५० कैद्यांना या उपक्रमांतर्गत मुलाबाळांना भेटता आले.
पप्पा शाळेला सुटी लागली…अन् त्याचे डोळे पाणावले कैद्यांचे त्याच्या मुलाबाळांसोबत गळाभेट हा अनोखा उपक्रम ठरला. मुलांना बघून अनेक कैद्यांना त्यांच्या हातून झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त देखील झाले, यात दुमत नाही. मात्र, घरातील ख्याली-खुशाली जाणून घेताना हत्येच्या आरोपाखाली बंदिस्त असलेल्या एका कैद्याने आपल्या चिमुकलीस तू कशी आहेस, असे म्हणताच ‘पप्पा मला शाळेला सुटी लागली. मी तुमची दररोज आठवण काढते, आजीदेखील विचारते,’ असे उत्तर मुलीकडून येताच त्याचे डोळे पाणावले.
आपल्या मुलांना भेटता यावे, यासाठी कारागृहात गळाभेट उपक्रम राबविण्यात आला. बंदिजन व त्यांच्या आप्तांना बुधवारी या उपक्रमादरम्यान काही काळ मुक्त वातावरणात घालवता आला. -कीर्ती चिंतामणी, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






