
बडनेरा लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर च्या नागझिरी फाट्यावर १ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास एका मालवाहू वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील इसम व त्याच्या एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर संतप्त जमावाने मालवाहू वाहन पेटवून दिले. याप्रकरणी पोलिसांनी दहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सय्यद मोहसीन सय्यद मुसा (४५, रा. ढंगारखेडा, ता. कारंजा लाड, जि. वाशीम) व आशना सैयद मोहसीन (१३) अशी मृतांची नावे आहेत. आयशा सैयद मोहसीन (१५) ही मोठी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ते तिघे काही कामानिमित्त अमरावतीकडे निघाले होते, तर त्यांच्या दुचाकीला धडक देणारे एमएच १५ जेसी १६७४ क्रमांकाचे पिकअप वाहन अकोल्याहून येत होते. सय्यद मोहसीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर आशनाचा वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला, आयशा (१५) हिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वाहनातील चालकासह अन्य व्यक्ती अपघातानंतर पसार झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मृत सय्यद मोहसीन यांचे नातेवाईक सय्यद मुदतशीर सय्यद हसन (रा. जमजमनगर), सय्यद अमीन सय्यद याकूब (रा. अंजनगाव बारी अशफाक खान रशीद खान (रा. माना) यांच्यासह ढंगारखेडा येथील अब्दुल मतीन अब्दुल रशीद, शेख शाहरुख शेख करीम, मोहम्मद आकिब मोहम्मद साबीर, इनायत खान, पाशु जमीर खान,इस्माईल खान, अब्दुल रशीद (सर्व रा. ढंगारखेडा) हे घटनास्थळी दाखल झाले. लोणी पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन ठाण्यात नेत असताना वरील इसमांसह १५ ते २० जणांनी अपघात घडविणाऱ्या चालक व मालकास पुढे आणा, अन्यथा आम्ही वाहन जाळून टाकतो, असा गलका केला. हे वाहन पुरावा म्हणून आवश्यक आहे, तुम्ही पेटवू नका, अशी समजूत घालूनही ते पेटविण्यात आले. यामुळे सहायक पोलिस निरीक्षक पंकज तायडे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता जमावाविरुद्ध गुन्हे दाखल केले.
ब्राह्मणवाडा टी-पॉइंटवर अपघात, दुचाकीस्वार ठार
चांदूर बाजार : शहरातील ब्राह्मणवाडा टी-पॉइंट समोरील ईदगाहपुढे दुचाकीला मालवाहू वाहनाने धडक दिली. २८ एप्रिल रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेत राजवीर पापा मोगरे (२४, रा. स्वीपर कॉलनी) हा मरण पावला. त्याच्यासमवेत संदेश राजू साबळे (१७, रा. इंदिरानगर, चांदूर बाजार) हा दुचाकीने परतवाड्याहून शहरात येत होता. चांदूर बाजार पोलिसांनी एम.एच. २७, एक्स. ३६४४ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
दुचाकी धडकल्या, युवक ठार वरूड : तालुक्यातील राजुरा बाजार ते चिंचरगव्हाण मार्गावर ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकी धडकल्या. त्यामध्ये दीपक वधारे (४५, रा. चिचरगव्हाण) यांचा मृत्यू झाला. ते किराणा घेण्याकरिता राजुरा बाजार येथे गेले होते. परतीच्या मार्गावर एम.एच. २७, व्ही. १६१६ या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झालेले दीपक वधारे यांचा मृत्यू झाला, अशी फिर्याद त्यांच्या पत्नीने नोंदविली. वरूड पोलिसांनी याप्रकरणी १ मे रोजी गुन्हा नोंदविला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







