
अमरावती : खुल्या अर्थव्यवस्थेवर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दराचे गणित अवलंबून आहे. यात शेतमालाला पुरेसे दर मिळत नाहीत. परिणामी कर्जाची परतफेड करता येत नाही. अशावेळी शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळला आहे.
पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्या तुलनेत गायीच्या दुधास अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी, दूध उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अनुदान मिळाल्याने दूध उत्पादकांत आनंद व्यक्त होत आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने पशुपालन कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत गावातच पुरेशा प्रमाणात दूध उपलब्ध होत नाही. शेतीला जोड व्यवसाय व्हावा, तसेच दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे पशुधनवाढीस मदत होत आहे. दरम्यान, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. शासनाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान घोषणा केली होती.
अनुदान शेतकऱ्यांना होतोय लाभ दूध उत्पादनवाढीसाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रोत्साहन योजनेपोटी जिल्ह्यातील ७ हजार ५०० दूध उत्पादकांच्या खात्यावर ३० लाख ३९ हजार ९२५ रुपये जमा होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे दुग्ध व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले.
अनुदानाचा लाभ कोणाला मिळतो?दोन दुधाळ जनावरे घेण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ७५ टक्के तर स्वहिस्सा अनुसूचित जाती २५ टक्के, शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के, स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के असे अनुदान दिले जाते.
म्हशीला सव्वा लाखाचे अनुदान या योजनेत दुधाळ जनावराची खरेदी करताना म्हशीला सव्वा लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान…अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील गायीच्या दूध उत्पादकांची माहिती ऑनलाइन सादर करण्यात आली. लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा होत आहे.
लिटरला किती अनुदान ? १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दुधाला ३.५ एसएनएफसाठी प्रति लिटर ३० रुपये दर होता. त्यानंतर १ ऑक्टोबरला प्रति लिटरला दोन रुपये वाढ करून सात रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






