सोशल मीडियावर फोटो झळकला अन् मायलेकींचा शोध लागला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

भामरागड : घरगुती भांडणामुळे रागाच्या भरात अल्पवयीन दोन मुलींसह त्यांची आई दीड वर्षापूर्वी घरूनच निघून गेली. त्यांचा शोध सुरू असतानाच महिलेच्या मुलींचा फोटो सोशल मीडियावर महिनाभरापूर्वी झळकला. याची माहिती पतीला मिळाली व त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित महिलेसह मुलींना कर्नाटक राज्याच्या बंगळुरू शहरातून शोधून भामरागड येथे बोलावून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. सुप्रिया संजय सरदार, असे त्या महिलेचे नाव आहे.

भामरागड येथील सुप्रिया सरदार ही पती संजय कालिपत सरदार यांच्याशी भांडण करून १५ जून २०२३ रोजी घरातून निघून गेली. संजय यांनी भामरागड पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता महिलेकडे मोबाइल नव्हता; पण तिच्या मुलींचा एक फोटो सोशल मीडियावर एका व्यक्तीने टाकला. याबाबत पतीला माहिती मिळताच त्याने पोलिसांना कळविले. त्यानंतर ते अकाउंट कोणाचे आहे, याची माहिती पोलिसांनी काढण्याचा प्रयत्न केला. फोटोमध्ये मुलींनी परिधान केलेल्या गणवेशावर शाळेचा सिम्बॉल अस्पष्ट होता. पोलिसांनी त्या सिम्बॉलशी समरूप असलेल्या सुमारे ३५ ते ४० शाळांची माहिती इंटरनेटवरून काढून प्रत्येक शाळेमध्ये चौकशी केली. चौकशी केलेल्या शाळेपैकी एका शाळेचा गणवेश मिळताजुळता आढळला. संबंधित संस्थाचालकाने सुरुवातील माहिती देण्यास नकार दिला; परंतु त्याला समज देताच त्याने आवश्यक सर्व माहिती चौकशी अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे महिलेला भामरागडात परत आणणे शक्य झाले.

 

येण्यास नकार, पोलिसांनी केले समुपदेशन सुरुवातीला सदर महिलेने भामरागड येथे परत येण्यास नकार दिला; परंतु पोलिसांनी तिचे समुपदेशन केले व तिला सुरक्षिततेची हमी दिली व विश्वासात घेतल्याने २५ डिसेंबर रोजी ती आपल्या दोन मुलींसह गावी परतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दीपक डोब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री सगणे करीत होत्या. त्यांना माधुरी वेलादी, रमेश वेलादी, शैलेश टोकला यांचे सहकार्य लाभले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013560
error: Content is protected !!