
तिवसा : देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुका एकूण सात टप्प्यांत होणार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यांत महाराष्ट्र व अन्य राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. परंतु, निवडणूक कार्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदानापासून वंचित मतदारांसाठी निवडणूक आयोग आठवा टप्पा राबविणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी आयोगाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच शासकीय यंत्रणेने चोखपणे आपापले कर्तव्य बजावले. परंतु, निवडणूक कार्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या कुन्हा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. विशेष म्हणजे, कर्मचारी कर्तव्यावर असताना मतदानासाठी आवश्यक असलेला १२ ए/१२ हा अर्जसुद्धा त्यांच्याकडून भरून घेण्यात आला नाही. निवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदाच वृद्ध व दिव्यांगासाठी होम टू होम व्होटिंग प्रक्रिया राबविली. परंतु, पोलिसांचा मात्र निवडणूक आयोगाला विसर पडल्याने संविधानाने बहाल केलेल्या मतदानाच्या हक्कापासून खाकीतील बरेचजण वंचितच राहिले. तेव्हा वंचित मतदारांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निवडणूक आयोग काय उपाययोजना करतो, याकडे वंचित मतदारांचे लक्ष लागले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






