
चिखलदरा : गावातील हातपंपाविषयी तक्रार घेऊन पंचायत समितीत गेलेल्या आदिवासी दिव्यांग युवकाला रिकाम्या कार्यालयातील केबिनचा व्हिडीओ काढल्याने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर ‘शिट्टी’ला मत दिल्याचे सांगताच वाहकाने बस थांबवून जंगलात उतरवून दिले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी चिखलदरा-परतवाडा मार्गावर घडला. यासंदर्भात युवकाने परतवाडा बस आगारात लेखी तक्रार केली. याशिवाय आ. बच्चू कडू व आ. राजकुमार पटेल यांची भेट घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
अनिल मोतीराम धिकार (रा. सलीता) असे अन्यायग्रस्त युवकाचे नाव आहे. बंद हातपंपासंदर्भात पंचायत समितीत तक्रार घेऊन तो गेला.कार्यालयात रिकाम्या खुर्चा, केबिनचे दृश्य त्याने मोबाइलमध्ये टिपले. हीबाब अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना देऊन ताब्यात घेण्यास सांगितले. पोलिसांनी रुग्णालयात नेऊन सोडून दिले.
जंगलात उतरविले चिखलदरा येथून बस (एमएच ५० एक्यू ६४५९) ने दुपारी ४:३० वाजता परतवाडाकडे निघाली. वाहकाने मतदान कोणाला केले, अशी विचारणा केली. ‘शिट्टी’ ऐकताच वाहकाने बस थांबवून मडकी गावानजीक हरी अमराईच्या जंगलात उतरवून दिले. हा प्रकार मोबाइलवर आ. राजकुमार पटेल यांना कळविला. प्रहारचे जगत शनवारे यांनी परतवाड्याला आणून सोडले.
आगारात तक्रार परतवाडा येथे आ. पटेल यांचे स्वीय सहायक प्रवीण तेलगोटे यांनी अनिलला बस आगारात नेऊन लेखी तक्रार दाखल केली. आ. बच्चू कडू व आ. पटेल यांची त्याने भेट घेऊन व्यथा सांगितली.
हातपंप बंद असल्याची तक्रार मिळाली. युवकाचे समाधान केले. तरीसुद्धा महिला व इतर कर्मचाऱ्यांशी उद्धट आणि अर्वाच्य भाषेत बोलत होता. पोलिसांना पाचारण करून बाहेर नेण्यास सांगितले.
जीवनलाल भिलावेकर (गटविकास अधिकारी)
आदिवासी युवकाला बसमधून उतरविल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाकडे लक्ष घालणार आहे.
– जीवन वानखडे (आगारप्रमुख परतवाडा)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







