मुख्यालयासह १४ पंचायत समितींमध्ये दर शुक्रवारी श्रमदान
सीईओ संजिता महापात्र यांची संकल्पना
अमरावती : जिल्ह्यात स्वच्छ मिशन अंतर्गत गाव स्मार्ट केली जात असतानाच जेथून या मिशनची अंमलबजावणी होते, अशा या जिल्हा परिषदेचे सर्व विभाग व अधिनस्त सर्व कार्यालय स्वच्छ व नेटके असणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यालयातील १२ विभागांच्या कार्यालयांसह १४ पंचायत समितीमधील सर्व कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता दर शुक्रवारी श्रमदान करण्याचा उपक्रम सीईओ संजिता महापात्र यांनी सुरू केला आहे. येत्या शुक्रवारपासून या उपक्रमाला जिल्ह्यात सुरुवात होणार आहे.
राज्यात मुख्यमंत्री यांनी १०० दिवसीय कृती आराखडा अंमलबजावणी १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत दशसुत्री अंमलबजावणी कार्यक्रम सर्वच शासकीय कार्यालयांना दिला आहे. सदरच्या १०० दिवसीय कृती आराखड्यात सीईओंनी सर्व शासकीय कार्यालय नियमित स्वच्छ राहील या दृष्टीने प्रयत्न करणे, तसेच दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी आपले अधिनस्त कार्यालयाची (अंतर्गत) सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता करणे, कार्यालय परिसराची स्वच्छता करणे.
तसेच कार्यालयातील दस्तऐवजांचे वर्गीकरण करून त्याची प्रचलीत पद्धतीनुसार रंगवार वर्गवारी करून बस्ते तयार करणे व त्यास सुव्यवस्थित ठेवणे, कार्यालयातील सन्माननीय व्यक्तीच्या प्रतिमांची स्वच्छता करणे तसेच प्लास्टिक बंदी व दंड, कार्यालय परिसरात धुम्रपान करण्यास मनाई व दंड, थुंकण्यास मनाई व दंड आदीचे फलक लावण्यात यावे. एकंदरीत आपले अधिनस्त कार्यालय नेटके, स्वच्छ व सुंदर असणे आवश्यक आहे. याकरिता आपण आपल्या स्तरावर कल्पकता वापरून कार्यालयाची सजावट करणे, अशा सुचना सीईओंनी पत्राद्वारे सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहे. त्यामुळे या शुक्रवारपासून जिल्हा परिषदेचे सर्वच कार्यालय स्मार्ट करण्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
स्मार्ट कार्यालयांमध्ये परिसर व कार्यालयातील स्वच्छतेला अधिक महत्व देण्यात आले आहे. याशिवाय सर्वच कार्यालयातील दस्तऐवजांचे वर्गीकरणाला अधिक भर दिल्या जात आहे. काही कार्यालयाने दस्तऐवजांचे वर्गीकरण केले आहे. आणखी बरेच विभाग शिल्लक आहे. ते येत्या काही दिवसांत होईल.
– संजिता महापात्र, सीईओ, झेडपी.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com