एस. टी. महामंडळ लक्ष देईना!
औराद शहाजानी/निलंगा : निलंगा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या औराद बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून याकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे या बस स्थानकाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील प्रवाशांमधून होत आहे.
औराद शहाजानी हे गाव दिवसेंदिवस वाढत्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करत आहे. सुमारे ३० ते ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १०० ते ११० फेऱ्या आणि कर्नाटक महामंडळाच्या ५० ते ६० फेऱ्या नियमितपणे धावतात. दररोज ४,००० ते ५,००० प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊनही स्थानकातील मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
औराद बस स्थानकात प्राथमिक सुविधांचा पूर्णत: अभाव आहे. प्रवाशांसाठी आवश्यक असलेली स्वच्छता गृह (प्रसाधनगृह), शुद्ध पिण्याचे पाणी, बसण्यासाठी निवारा तसेच वेटिंग रूम यांसारख्या मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. परिणामी, प्रवाशांना अस्वच्छता, उन्हाळ्यात उन्हाचा त्रास आणि पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागतो.
गेल्या वर्षी स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. निलंगा आगारातील निलंगा, कासारशीर्शी आणि शिरूर अनंतपाळ या ठिकाणी नवीन बस स्थानकांचे काम पूर्ण झाले असताना औराद बस स्थानक मात्र दुर्लक्षित का? हा प्रश्न औरादकरांना सतावत आहे.
आमदारांनी लक्ष घालण्याची गरज
औराद बस स्थानकासाठी तातडीने सुधारणा करून प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासाठी आमदार संभाजी भैय्या पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महामंडळ प्रशासनाने लक्ष घालून नवीन बस स्थानकाच्या उभारणीसाठी त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com