स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १४ गुन्ह्यांची उकल
अमरावती : महावितरणच्या डीपीमधील ऑइल व केबल चोरणाऱ्या व चोरीचा तो माल विकत घेणाऱ्या अशा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. २० फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. अब्दुल इद्रीस अब्दुल शहीद (४५ वर्षे, रा. मुर्तिजापूर) व भंगार विक्रेता मो. सलीम मो. हमीद (रा. अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने तब्बल १४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
महावितरणचे सहायक अभियंता सुदाम पाकधाने यांनी ६ जानेवारी रोजी लोणी ठाण्यात कृषी पंप रोहित्र, लोणी येथील स्टोन क्रशर गावठाण रोहित्र, फुलआमला येथील कांडलकर कृषी पंप रोहित्र व ऑइल अज्ञात चोराने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती.
लोणी पोलिस ठाण्यात नोंद डीपी ऑइल चोरीचे आठ, केबल तार चोरीचे दोन गुन्हे, चांदूर रेल्वे, नांदगांव खंडेश्वर, तिवसा व कुन्हा येथील प्रत्येकी एक असे चार असे एकूण १४ गुन्हे उघड झाले आहेत. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मूर्तिजापूर येथील अब्दुल हा दुचाकीने अमरावतीत चोरलेल्या ऑइल तसेच केबल तार चोरीचे पैसे घेण्याकरिता आल्याची माहिती एलसीबीला मिळाली.
आधी मोटरसायकलने रेकी आरोपी अब्दुल इद्रीसने लोणी, नांदगांव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा व कुऱ्हा परिसरात आधी मोटर सायकलने पाहणी करून नंतर डीपीमधील ऑइल तसेच केबल चोरी केल्याची कबुली दिली. तो माल अमरावती येथील भंगार विक्रेता मो. सलीम मो. हमीद याला विकल्याचे त्याने सांगितले. त्याआधारे मोहम्मद सलीमच्या घराची घरझडती घेण्यात आली. त्याच्या घरातून २५ लिटर डीपी ऑइल व ८५० फूट केबल असा ३४ हजारांचा माल जप्त करण्यात आला. तर, अब्दुल इद्रीस याच्याकडून एमएच ३०, बीआर ६७५७ही दुचाकी जप्त करण्यात आली.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com