चिखलदरा : ‘कितेक दिन हो गया रे साब… हमारे गरीब मजदूर का पैसा नही मिला… वो तो अच्छा हुआ… लाडकी बहन का पैसा मिला… तो किराना लाया… कैसा तभी घरदार चला रहा… नहीं तो भुका मरता…!’ चिखलदरा तालुक्यातील सलोना येथील आदिवासी सरपंच आरती सुरेश बेलसरे यांनी सोमवारी पंचायत समितीच्या आमसभेत हा गंभीर मुद्दाआमदारांपुढे मांडला. मनरेगाची ४५ हजार मजुरांची ४१ कोटी रुपयांची मजुरी अडीच महिन्यांपासून अडकली आहे. मजुरी देण्यासाठी पंधरा दिवसांचा नियम बासनात गुंडाळला गेल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.
चिखलदरा पंचायत समितीची आमसभा मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. माणसं कामाला जात असली तरी लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर घर चालत असल्याचे सरपंचांनी कथन केले.
जल्दी मजुरी दे दो रोजगार हमी योजनेवरील मजुरांना २७० ते २९० रुपयांपर्यंत रोजंदारी मिळते. ‘जल्दी मजुरी दे दो साब’, अशी कळकळीची विनंती सरपंच आरती बेलसरे यांनी केली.
होळी अंधारात जाणार का?
आदिवासींना दिवाळीपेक्षा सर्वांत मोठा सण होळी आहे. त्यापूर्वी मजुरी मिळाली नाही, तर सर्व मजूर आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
होळीपूर्वी आदिवासींना मजुरी मिळावी, यासाठी आपण स्वतः पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. लवकरात लवकर पैसे मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहे.
केवलराम काळे, आमदार, मेळघाट

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com