पशुप्रदर्शनाला लावली हजेरी : अंगणवाडी केंद्र, पीएचसीत पाहणी
अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्याचे विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी सीईओंनी नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा दौरा केला. या आकस्मिक दौऱ्यात त्यांनी शाळा, अंगणवाडी, नरेगा वृक्ष लागवडीची कामे, सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम आदी ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन तेथील परिस्थितीची ‘ऑन द स्पॉट’ पाहणी केली.
जिल्हा परिषदेसह अधिनस्थ यंत्रणेतील कामकाजाची गती वाढविण्यावर भर आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्र यांनी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता जनुना येथे सुरू असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बांधकामाची स्पॉट पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामातील मटेरियल, कामाचे अंदाजपत्रक व कामाची गुणवत्ता आदींबाबत विस्तृत माहिती घेतली. यानंतर त्यांनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत थेट पोहोचत वर्गात एन्ट्री केली.
याप्रसंगी सीईओंनी शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापनविषयक काही प्रश्न विचारले. वर्गात बसून विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. सीईओंच्या अचानक भेटीमुळे शाळेतील शिक्षकही बुचकळ्यात पडले होते. सीईओंनी शाळेतील सुविधा व अन्य कामकाजाची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांकडून जाणून घेतली. यानंतर अंगणवाडी केंद्रात जाऊन चिमुकल्यांसोबत संवाद साधला.
सीईओंच्या आस्कमिक भेटीमुळे कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली होती. या भेटीदरम्यान नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, जलसंधारण विभाग व रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पशुप्रदर्शनाला लावली हजेरी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वाढोणा रामनाथ येथील पशुप्रदर्शनाला हजेरी लावली. याप्रसंगी सीईओंनी पशुप्रदर्शनातील पशुधनाची पाहणी केली. यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागामार्फत सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामाची ऑन द स्पॉट पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पापळ पीएचसीत पाहणी पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर उपचारार्थ आलेल्या रुग्णांशी संवाद साधून आरोग्याच्या सुविधांबाबत माहिती घेतली. स्थानिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com