अमरावती : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व पोट फुगल्याने पोटच्या २० दिवसांच्या बाळाला तब्बल ६५ चटके (डंबा) देणाऱ्या आईविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी रात्री मारहाण, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ३ व बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५) च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला.
याबाबत राजू लालमन धिकार (३०, रा. सिमोरी, ता. चिखलदरा) या पित्याने तक्रार नोंदविली. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात त्या बाळाला दाखल केल्यानंतर तो अघोरी प्रकार उघड झाला होता. राजू धिकार यांच्या पत्नीने ३ फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला. २३ फेब्रुवारी रोजी त्या बाळाची तब्येत खराब झाली. त्याचे पोट फुगल्याने आई फुलवंती (२७) हिने गावठी इलाज म्हणून व जादूटोणाच्या उद्देशाने बाळाच्या पोटावर नायलॉनच्या काळ्या धाग्याने जाळून त्याला गरम चटके दिले. त्यानंतर त्या बाळाला हतरू, चुरणी व अचलपूर येथून अमरावतीत हलविण्यात आले.
चिखलदरा पोलिसही पोहोचले डफरिनमध्ये चिखलदरा पोलिसांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचून राजू धिकार याचे बयाण घेतले. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बाळाच्या आईने त्याला चटके दिल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले. राजू धिकार यांच्या वतीने चिखलदरा येथील हवालदार अमोल भोंडे यांनी ती तक्रार नोंदविली.
नवजात बाळाला चटके दिल्याप्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी रात्री एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.
प्रशांत मसराम, ठाणेदार, चिखलदरा

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com