सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर, गाडगेनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल
अमरावती : पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त, मुख्य वनसंरक्षक व तत्सम बड्या अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाहून यापूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. त्या मालिकेत आता चक्क येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कांता नगर परिसरातील बंगल्याची कडक सुरक्षाव्यवस्था भेदून त्या परिसरातून चोरांनी दोन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पहाटे उघड झाला आहे. अज्ञात चोराने थेट प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या घराला लक्ष्य केले आहे. या संदर्भात कर्मचारी शुभम गोलाईत (२८) यांनी गाडगेनगर ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार, दररोज प्रमाणे ते बुधवारी रात्री रात्रकालीन ड्युटीसाठी न्यायाधीश बंगल्यावर पोहोचले. रात्री दोनच्या सुमारास न्यायाधीशांनी दरवाजा उघडून गोलाईत यांना झोपेतून उठवले आणि बाहेरून कशाचा तरी आवाज आल्याचे सांगितले. बाहेर पडले असता तेथे चंदनाचे झाड कापलेले दिसले. मागील भागातील चंदनाचे झाडही तोडण्यात आल्याचे दिसून आले.
दोन्ही झाडे पाच वर्षांची या दोन्ही झाडांचे वय सुमारे ५ वर्षे असून, ज्यांच्या लाकडाची बाजारातील किंमत सुमारे २० हजार रुपये आहे. या तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तात्काळ अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजदेखील संकलित केले जात आहे. ठाणेदार ब्रम्ह गिरी यांच्या मार्गदर्शनात घटनेचा तपास सुरू आहे.
गतवर्षीही चंदनचोरी गेल्या वर्षी जून महिन्यात येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कॅम्पस्थित शासकीय निवासस्थानाचा परिसर आणि एसडीएफ प्राथमिक शाळेच्या आवारातील तीन चंदन वृक्ष कापून नेण्यात आले होते. त्या घटनेत कटर मशिनचा वापर करण्यात आला होता.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com